भारतात बाकी विविधता खूप आहे. पण गरिबी व श्रीमंती या अशा दोन बाबी आहेत; ज्या दोन रेषा एकमेकांना कधीच मिळत नाहीत.
वर्तमानपत्रात भारतातल्या, जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची नावं येतात. त्यांच्या संपत्तीचे आकडे प्रसिध्द होतात. भारतामध्ये असाही एक वर्ग आहे, ज्याला मरेपर्यंत अंगभर कपडाही कधी मिळत नाही. ज्याला आयुष्यभर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्याचा संसार आयुष्यभर विवंचनेतच चालतो.
महात्मा गांधी नावाचा असा एक महात्मा याच भारतात होऊन गेला. ज्याने ठरविले की, भारतातील जनतेला जर अंगभर वस्त्र नेसायला मिळत नसेल तर मला अंगभर वस्त्र घालण्याचा काय अधिकार आहे? त्यामुळे शरीर झाकण्यासाठी केवळ एक पंचा गुंडाळून त्यांनी आयुष्य काढले, समोरच्याचं दुःख पाहून ज्याचं हृदय करुणेने व्याकूळ होतं व एका विचारधारेवर आयुष्यभर ही माणसं चालत राहतात. त्या विचाराला सलामच केला पाहिजे.
वाममार्गाने प्रचंड पैसा कमावणारा एक नवा वर्ग भारतात तयार झाला आहे. हा वर्ग सतत त्या पैशांच्या मस्तीत असतो; ज्याला राष्ट्राबद्दल प्रेम, आर्थिक समानता, सामाजिक बांधिलकी अशा बाबींशी काही देणंघेणं नाही. या व्यक्ती पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ
शकतात व आयुष्यभर पैशांचीच भाषा बोलत राहतात. सगळे व्यवहार पैशात मोजू पाहतात. तशी धारणा भारतात आता बळकट व्हायला लागली आहे, नव्हे झाली आहे. आज पैशाची भाषा बोलणाऱ्यांची संपत्ती हजारो कोटी नव्हे कितीतरी अब्जांच्या संख्येत आहे.